वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध | Vargatil Bakanche Manogat Essay In Marathi Best 100-400 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध | Vargatil Bakanche Manogat Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत

Vargatil Bakanche Manogat Essay In Marathi

Vargatil Bakanche Manogat Essay In Marathi

निबंध लेखन – वर्गातील बाकांचे मनोगत

[ मुद्दे : शाळेची भेट होण्याचा प्रसंग  – शाळेच्या दर्शनाने बालपण जागे -बाकेसुद्धा चैतन्यपूर्ण बनणे  -बाकांशी जडलेले नाते  -नेहमीच्या मित्रमैत्रिणी  – एखादी आठवण – त्या वेळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्याची कल्पना  – शाळेसाठी काहीतरी करण्याची सूचना ]

ती आज खूप खुशीत होती. खूप शिकली होती. चांगल्या कंपनीत उच्च पदावरची नोकरी. भरपूर पगार… आज ती अनेक वर्षांनी आपल्या गावात शिरत होती. स्वत: गाडी चालवत! गावात शिरताच सगळे बालपण झरझरत डोळ्यांसमोरून सरकत गेले.

मित्रमैत्रिणींबरोबरचे शाळेतले रम्य क्षण तिच्या मनात बागडू लागले. आठवणीतला एकेक क्षण ती गोळा करू लागली. शाळा जवळ येताच ती थांबली आणि डोळे भरून शाळा पाहू लागली. मंद पावलांनी ती शाळेत शिरली.

आपल्या जुन्या वर्गात गेली. आणि… आणि वर्गात पाऊल टाकताच हर्षाची, उल्हासाची सळसळ तिच्या कानांना स्पर्शेन गेली. तिने चमकून पाहिले. वर्गात कोणीच नव्हते. मे महिन्याची सुट्टी चालू होती. मग आवाज? तिने बारकाईने पाहिले. सर्व बाके हर्षोत्फुल्ल चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती.

होय, बाकांचाच आवाज होता तो. “काय ग, किती छान दिसतेस! तुला पाहून खूप खूप आनंद झाला. तुझ्या वेळचे दिवस जसेच्या तसे दिसू लागले बघ! तू या वर्गात आलीस, त्याच वर्षी आम्हीसुद्धा या शाळेत आलो. आम्हांला बघून तुम्हांला केवढा आनंद झाला होता!

तुम्ही हसत खिदळत वर्गात शिरला होता. मोक्याची जागा पकडण्यासाठी केवढी धडपड चालली होती तुमची!” बाकालाही खूप आनंद झाला होता. ती तिच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसली.

त्या बाकाने तिला प्रेमाने जवळ केले. म्हणाले, “बस, बस. बघ माझ्या अंगावर तू तुझे नाव कोरले आहेस. आठवते? अजूनही आहे बघ ते!” तिने त्यावरून हात फिरवला. “किती हुशार होतीस तू, नाही? तुझे नेहमी कौतुक व्हायचे!

तुझ्या सोबत कायम असणारी तुझी मैत्रिण रोहिणी भेटते का ग तुला? किती गप्पा मारायच्या तुम्ही! सगळ्या गप्पा ऐकल्या आहेत मी. मधल्या सुट्टीत भेटून डबा खाता का ग अजून?’ तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. “तुला आठवते काय ग?

तू सातवी पास झालीस, तेव्हा रानडेबाई तुझ्या घरी आल्या होत्या. ‘गावात हायस्कूल नाही. तरी हिला घरी ठेवू नका. खूप हुशार आहे पोर. तिला खूप शिकवा. मोठी होईल. नाव काढेल.’ तूसुद्धा हे खरे केलेस ना? आज कशी रुबाबात गाडी चालवत आलीस!”

तिला खूप गोष्टी भराभर आठवू लागल्या. केवढा सुखाचा ठेवा दिलाय या शाळेने! सुखामागे धावता धावता आपण खऱ्या सुखापासून दूर गेलो की काय? तेवढ्यात बाक पुढे बोलू लागले, “तुम्ही मित्रमैत्रिणी भेटता का ग? आमच्यासाठी एक करशील?

तुझ्या वेळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र कर. सगळेजण या इथे एकदा. इंटरनेट, फेसबुक इत्यादींच्या साहाय्याने सगळ्यांना गोळा करणे सोप्पे आहे ना? कर ना मग तसे. तुम्ही कोण कोण, कुठे कुठे आहात? काय काय करता?

हे आम्हांलाही कळेल. आम्हीसुद्धा तुमच्यासोबत हसू, खेळू. आणखी एक करशील? तुमच्या सुखातला एक एक दाणा इथल्या आताच्या बाळांच्या हातावर ठेवा. त्यांचेही बालपण सुखद होईल.”

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • शाळेतील बाकांचे मनोगत निबंध / Shaletil Bakanche Manogat Marathi Nibandh
  • शाळेतील बाके बोलू लागली मराठी निबंध / Shaletil Bake Bolu Lagli Marathi Nibandh
  • शाळेतील बॅनच बोलू लागले मराठी निबंध दाखवा / Write Essay On Bench

हे सुद्धा वाचा

आम्हाला आशा आहे की शाळेतील बाके मनोगत मराठी निबंध लेखन / Essay On Shaletil Bake In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group
x