एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध | Eka Putlyache Manogat Essay In Marathi Best 100-400 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये एका पुतळ्याचे गाऱ्हाणे मराठी निबंध लेखन / Eka Putlyache Manogat Essay In Marathi 100 ते 400 शब्दांत निबंध लेखन करणार आहोत

Eka Putlyache Manogat Essay In Marathi

Eka Putlyache Manogat Essay In Marathi

निबंध लेखन –  एका पुतळ्याचे मनोगत

[ मुद्दे : पुतळ्याचे सर्वांच्या वतीने बोलणे -पुतळ्यांची दुर्दशा – वाईट अवस्थेविरुद्ध चीड पुतळा त्या महात्म्याचा अपमान – त्या महात्म्यांचा सन्मान राखण्यासाठी पुतळ्यांचा सन्मान आवश्यक त्या महात्म्यांचे कार्य चालू ठेवणे आवश्यक ]

“भारतातील सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या माझ्या समस्त प्रिय पुतळ्यांनो, तुम्हा सर्वांना माझे त्रिवार प्रमाण! ‘आज तुम्हा लाखो पुतळ्यांना समोर बसलेले पाहून माझा ऊर भरून आला आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून उभा राहताना माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे.

बाहू फुरफुरताहेत. इतिहासात कधीही न घडलेली घटना आज घडत आहे. भारतातील सर्व पुतळे संघटित झाले आहेत. आपल्यावरील अन्यायाचा नायनाट करायला सिद्ध झाले आहेत. आज तुम्हा सर्वांसमोर जाहीर ग्वाही देतो की, माझ्या देहात पाषाणाचा शेवटचा कण असेपर्यंत मी तुमच्यासाठी लढणार!

आता आपण गप्प बसायचे नाही. निर्मळ नैसर्गिक पर्यावरणात जगायला मिळणे हा सर्वांचाच जन्मसिद्ध हक्क आहे. पण आपल्याला कुत्राही विचारत नाही. आपणा सर्वांच्या अंगावर वर्षानुवर्षे धूळ साचत आली आहे.

कावळ्याचिमण्यांनी केलेली घाण तर गेल्या काही वर्षांपासून तशीच आहे. आमच्या आसपास सर्वत्र घाण, कचऱ्याचे डोंगर, वाहती गटारे, उंदीर, घुशी, भटकी कुत्री यांची बजबजपुरी माजली आहे. संध्याकाळी आमच्या पायथ्याशीच गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेला असतो.

पुण्यवान महात्म्यांचे पुतळे बसवतात; पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अनीतिमान हातांनी त्यांचे अनावरण केले जाते, तेव्हा आमच्या काळजाला इंगळ्या डसतात. आपण हलू शकत नाही, बोलू शकत नाही. आपण मुकेबहिरे. म्हणून का आमच्या अब्रूचे असे धिंडवडे?

“खरं सांगायचं तर माणसांनी आरंभलेली ही विटंबना आपली नव्हेच. ज्याच्या स्मरणार्थ मला माणसांनी उभारले आहे ना, त्या थोर मानवाची ही विटंबना आहे. हा पुतळा उभारला, तेव्हा केवढा जंगी सोहळा पार पडला !

मोठमोठ्या नेत्यांनी तोंडभरून त्या महापुरुषाची स्तुती गायली! किती हार ! किती तुरे! पुतळा घडवणाऱ्या त्या शिल्पकाराने महिनोन्महिने कष्ट घेतले. आपले सर्व कलासामर्थ्य त्याने पणाला लावले. त्या महापुरुषाच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याची कल्पना निघाली तेव्हापासून ते अनावरणाचा सोहळा पार पडेपर्यंत किती उत्साह होता प्रत्येकात !

पण त्या महापुरुषाला लोक विसरले! त्या महापुरुषाने या समाजासाठी किती खस्ता खाल्ल्या! आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक सुखावर निखारा ठेवून त्याने आपले जीवन सर्वस्वाने समाजाला अर्पण केले. पण माणसे किती कृतघ्न त्याचे कार्य ती विसरली.

अवतीभोवती पाहा. स्त्रियांवर, गोरगरिबांवर अत्याचार चालूच आहेत; किंबहुना वाढले आहेत. जातिधर्मामध्ये विद्वेष पसरला आहे. काही समाजकंटक तर पुतळ्याची मुद्दाम विटंबना करतात आणि समाजासमाजात द्वेषाचा आगडोंब उसळवतात;

त्यामुळे मग रक्ताचे सडे पडतात! म्हणजे त्या महापुरुषाच्या शिकवणीविरुद्ध माणसे वागतात. हा त्याचा पराभवच आहे. मग कशाला हवेत हे पुतळे ? खरं तर त्याने केलेल्या कार्याचा एक-सहस्रांश भाग जरी माणसांनी आचरणात आणला, तरी त्यांचे जीवित सफल झाले, असे होईल.

“समस्त पुतळ्यांनो, आपण आपला निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला पाहिजे. आपल्या प्रमुख मागण्या जाहीर केल्या पाहिजेत.

आपल्या मागण्या अशा :

  • चारित्र्यवान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या हातूनच यापुढे कोणत्याही पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला पाहिजे.
  • ज्या महापुरुषांचे पुतळे उभारतात, त्यांचे किमान ५०% कार्य सरकारने केलेच पाहिजे, अशी घटनात्मक सक्ती केली पाहिजे.
  • अशा महापुरुषांच्या शिकवणुकीविरुद्ध वागणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. तशी कायद्यात तरतूद केली पाहिजे
  • परदेशात जसे पुतळ्यांना सन्मानाने वागवतात, तसे बाराही महिने आम्हांला येथे वागण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली पाहिजे.
  • एक ‘पुतळा संकुल’ उभारले जावे. तेथेच सर्व जातिधर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारावेत. “माझ्या समस्त प्रिय पुतळ्यांनो आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी येत्या निवडणुकीत मला प्रचंड बहुमतांनी निवडून दया!”

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध / Eka Putla Manogat Marathi Nibandh
  • एका पुतळा मराठी निबंध लेखन दाखवा / Statue Essay In Marathi
  • पुतळ्यावर मराठी निबंध लिहा / Write Essay On Statue In Marathi

आम्हाला आशा आहे की एका पुतळ्याचे मनोगत / गाऱ्हाणे निबंध लेखन मराठी मध्ये / Essay On Eka Putlyache Manogat In Marathi हा निबंध नक्कीच आवडला असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group