उद्यानातील फेरफटका मराठी निबंध | Udyanatil Ferfatka Essay In Marathi Best 100-400 Words

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण उद्यानातील फेरफटका मराठी निबंध | Udyanatil Ferfatka Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत.

Udyanatil Ferfatka Essay In Marathi

Udyanatil Ferfatka Essay In Marathi

निबंध लेखन – उदयानातील फेरफटका

मुद्दे : उद्यानाचे प्रथम दर्शन – कुटुंबाला प्रवासाची आवड – उद्यानात नावीन्यपूर्ण फलक – औषधी वनस्पती – फुलझाडे – कमळांचा तलाव – बालकांचा हिरवळीवर फेरफटका – उद्यानाच्या आठवणी घेऊन घरी

त्या उद्यानात आम्ही प्रवेश केला मात्र, अगदी प्रथमदर्शनीच मी त्या जागेच्या प्रेमात पडलो. उदयान म्हटल्यावर जे डोळ्यांसमोर येते, त्यापेक्षा वेगळेच रूप तेथे साकार झाले होते.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर हिरव्या रंगाचे हात आमचे स्वागत करीत होते आणि लाल-पिवळ्या बोगनवेलींनी आमच्यावर प्रेमाने हलकी-हलकी पुष्पवृष्टी केली. मन हर्षोत्फुल्ल झाले होते. उद्यानाच्या आत मी कधी प्रवेश केला ते माझे मलाच कळले नाही. कालच मी नव्याने उद्घाटन केलेल्या उद्यानाला भेट दिली होती, त्यावेळचा हा माझा अनुभव मी खरेच कधीही विसरणार नाही.

खरे तर! माझ्या आई-बाबांना फिरण्याची खूप आवड आहे. वर्षातून एकदा दूरचे पर्यटन व अधून-मधून छोटे-छोटे प्रवास करून निसर्गसान्निध्यात जाणे हा आमच्या कुटुंबाचा सणासुदीचा मोठा दिवस असतो. पण हे सगळे नाही जमले तर आसपासच्या उद्यानात किंवा बाजारात फेरफटका मारायचा हे माझे मात्र निश्चित असते. म्हणूनच आमच्या परिसरातच एक वैशिष्ट्यपूर्ण उदयान उभे राहत आहे असे कळले, तेव्हा मला त्याविषयी खूपच उत्सुकता लागून राहिली होती आणि उद्घाटन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी त्या उद्यानात प्रवेश केला होता. सुरुवातीपासूनच उद्यानात नावीन्याचे दर्शन घडत होते.

उद्यानात सर्वत्र ‘या निरोगी व्हा!’, ‘या सुगंधित व्हा!’ असे सुंदर अक्षरांतले कल्पकतापूर्ण फलक मनाला मोहिनी घालत होते, कुतूहल जागृत करीत होते. ‘औषधी वनस्पतींकडे’, ‘सुगंधी फुलझाडांकडे’ असे हिरवे बाण अदबीने वाट दाखवत होते. मी काही औषधी वनस्पतींची नावे ऐकली होती, पण प्रत्यक्ष त्या वनस्पती पाहिल्या नव्हता. ‘चला, आता पाहू या’, असे म्हणून तिथे वळले, तर हिरडा, बेहडा, आवळकाठी या त्रिफळाचूर्णातील तीन वृक्षांनी माझ्यावर चवऱ्या ढाळल्या. शमी, दूर्वा, कोरफड, माका, सर्पगंधा, गुळवेल, अगस्ती, बेल इत्यादी वनस्पती आपली ओळख सांगत उभ्या होत्या. प्रत्येक वनस्पतीचे नाव व तिचा उपयोग यांच्या सुंदर अक्षरांतील पाट्या माझे लक्ष वेधत होत्या. औषधी वनस्पती विभाग संपताना एका पाटीने माझे लक्ष वेधले. येथील सर्व वनस्पती उज्जैनहून एका उद्यानातून एका उदयानतज्ज्ञाच्या देखरेखीखाली आणल्या होत्या व त्या वनस्पतींचे पुनर्वसन केले. एका सुंदर फलकावर त्या उदयानतज्ज्ञाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता.

तेथून पुढे कोठे जावे हा विचार मनात येण्याआधीच सोनटक्का, चाफा, बकूळ या सुगंधी फुलांनी मला आकर्षित केले होते. वाफ्यातील गुलछडी, लिली या फुलांनी मला मोहित केले. तसेच कागडा, नेवाळी, मोगरा, जाई, जुई यांची पांढरीशुभ्र फुले वाऱ्यावर डोलत होती. गुलाबाचे मनोहारी रंग तर जिवाला वेड लावत होते. तेवढ्यात तिथे पुढेच असलेल्या एका तलावाने मला त्या सुगंधी वातावरणातून बाहेर आणले.

गुलाबी, निळ्या, पांढऱ्या कमळांनी भरलेला तो तलाव माझ्या नजरेस पडला आणि माझी पावले तिकडे वळली. हिरवी पाने व रंगीत कमळे यांनी ‘शोधा बरे चिखल कोठे आहे तो!’ अशी माझी स्थिती केली. या जलाशयाच्या आसपास खास छोट्यांसाठी हिरवळ तयार केली होती. कित्येक पालक त्या मखमली हिरवळीवर आपल्या नुकत्याच चालू लागलेल्या लहानग्यांना चालवत होते, मुले हसत खिदळत होती. काही ठिकाणी आजी-आजोबा आपले हात-पाय मोकळे करण्यासाठी फेरफटका मारत होते. काही तरुण मंडळी आनंदाने विहार करीत होते.

आता सांजावले होते. अंधार पसरू लागला होता. इतक्यात फोन खणखणला, “कोठे आहेस? घरी ये.” आता घरी परतायला हवे!

पण, मन मात्र या उद्यानातच रुंजी घालत होते. पुन्हा यायचे आणि या उद्यानाची ओळख वाढवायची, नाते घट्ट असे मनाशी ठरवले!

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • उद्यानातील फेरफटका मराठी निबंध दाखवा / Udyanatil Ferafataka Marathi Nibandh 
  • उद्यानात फिरायला गेलो वर मराठी निबंध / Udyanat Firayla Gelo Var Marathi Nibandh 
  • उद्यान मराठी निबंध लेखन करा / Write Essay On A Walk In The Park In Marathi

तुम्हाला उद्यानातील फेरफटका तर मराठी निबंध / Essay Writting On udyanatil ferfatka In Marathi हे निबंध लेखन कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा धन्यवाद,

WhatsApp Group Join Group