मी आणि भूत मराठी निबंध | Me Aani Bhut Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण मी आणि भूत मराठी निबंध / Me Aani Bhut Essay In Marathi  हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

Me Aani Bhut Essay In Marathi

Ghost Essay in Marathi

मुद्दे : ठिकाण एकाकी, मुख्य वस्तीपासून दूर – मी एकटा • वातावरण साधारणपणे भीतिदायक-भीतीच्या भावनेने ग्रस्त – • हालचालींवर भीतीची छाया – त्यामुळे काही भास-भूतदर्शनाचा उलगडा-वैज्ञानिक स्पष्टीकरण)

प्रसंगच तसा भयंकर होता. मी मामाच्या गावी आलो होतो. मामाचे घर गावाच्या एका टोकाला आहे. एस.टी. संपते तेथून दहा मिनिटे चालावे लागते. डोंगरातली घाटी चढून जावे लागते. घराच्या चहूबाजूंनी दाट झाडी आहे. घर तसे रानातच आहे. त्या वाडीत अशी एकूण सहा घरे आहेत. प्रत्येक घर एकटे. सर्व घरे एकमेकांपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर. अत्यंत रमणीय परिसर. मामाचे घरच नव्हे, तर संपूर्ण गावच मला खूप आवडते.

पण त्या दिवशी तो भयंकर प्रसंग घडायचा होता. त्या दिवशी कुठल्या तरी कारणाने घरातली सर्व माणसे दुसऱ्या गावी गेली होती. मी आग्रहाने एकटाच घरात थांबलो. सर्वजण संध्याकाळी परतणार होते. संध्याकाळपर्यंतचा वेळ आनंदात झरझर निघून गेला. पण संध्याकाळ झाली तरी घरातले कोणी परतले नाही आणि माझा धीर सुटू लागला.

संध्याकाळ संपली. रात्र सुरू झाली. तीही हळूहळू पुढे सरकू लागली. पण कोणाचाच पत्ता नव्हता. मी घरात एकटाच. बाहेर तर मिट्ट काळोख पसरला होता. रातकिड्यांची किर्रकिर्र चालू होती. त्यातच पावसाने जोर धरला होता. चहूकडून बेडकांचा आवाज येत होता. शेकडो कीटकांच्या हजारो चित्रविचित्र आवाजांनी रान भरून गेले होते. झाडावर, छपरावर, जमिनीवर  पावसाचे थेंब ताडताड आपटत होते.

मध्येच पंखांची फडफड करीत व चित्कारल्यासारखा आवाज करीत वटवाघळे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होती. एक चिंब भिजलेला कावळा खिडकीतून आत घुसण्याचा सारखा प्रयत्न करीत होता, सोसाट्याचा वारा सुटला होता. दाराखिडक्यांचा आपटण्याचा आवाज होत होता. त्यातच अचानक काहीतरी सरपटत गेल्याचा आवाज येई.

आता मात्र मी पुरता घाबरलो होतो. घरातले कोणीही अजून परतत नव्हते. माझ्या छातीत धडधड होत होती. मी सारखा उठत होतो. बसत होतो. हे उचल. ते ठेव. हे सारखे कर. ते नीट ठेव. असे माझे चालले होते. मी सारखा पाणी पीत होतो. हातपाय स्थिरच होत नव्हते. साधी फोनची बटने दाबतानाही हात थरथरत होते. माझ्या रोमारोमात भीती दाटली होती. मनात शंकाकुशंकांचा कल्लोळ उठला होता. माझे पाय थरथरू लागले होते. पण मी ते जमिनीवर घट्ट दाबून धरले होते. तेवढ्यात चिखलातून रपरप आवाज करीत कोणीतरी येत असल्याचा भास झाला.

मला अतोनात आनंद झाला. कोण ते पाहण्यासाठी मी खिडकीकडे धावलो. पण मला खिडकी उघडायचा धीरच होईना. तेवढ्यात पायांचा आवाज थांबला. मी कानोसा घेऊ लागलो. पण कोणतीही चाहूलच नव्हती. मग मात्र मी धसकलो. कोण आले असेल? घराबाहेर थांबून का राहिले? बाहेरून टेहळणी करीत असेल का? आता, अशा अवेळी? भूतबीत तर नसेल ना? असल्या अनेक शंकांनी माझा जीव घाबराघुबरा झाला. घरातली माणसे कधी एकदा येतात, असे मला झाले. मी फोन करायला धावलो. पण तो बंद पडला होता. मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर होता.

तेवढ्यात खिडकीकडे काहीतरी चमकलेले मी पाहिले. तर पिवळ्या फ्लोरोसेन्ट रंगाचे डोळे आत निरखून पाहत होते. “कोण आहे?” असे मी मोठ्याने ओरडून विचारले. पण माझा आवाजच फुटेना. संपूर्ण शरीरच थरथरू लागले. थोड्याच वेळात ते चमकदार दोन डोळे खिडकीच्या काचेला बाहेरून चिकटले. अगदी कागद चिकटवतात तसे…. आणि सरकत सरकत काचेवर फिरू लागले. माझी बोबडीच वळली. मी जिवाच्या आकांताने धावत सुटलो. कडी काढून धाडकन दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो.

बाहेर पडता पडता मागे बघितले मात्र… खिडकीच्या काचेतून एक हात आरपार आत येत होता आणि लांब होत होत माझ्याकडे सरकत होता. मी मोठमोठ्याने ओरडत पळत सुटलो. तेवढ्यात पाय अडखळून पडलो. तरीसुद्धा मी उठून पळण्याचा प्रयत्न करू लागलो. पण माझे पायच उचलेनात. प्राणपणाने उठून पळू लागलो. पण मी जमिनीला पुरता जखडला होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो.

पण आवाज फुटत नव्हता… ….थोड्याच वेळात मला जाणवू लागले. मी पांघरुणात गुरफटून मोठमोठ्याने ओरडत होतो. घरातले सगळेजण माझ्या भोवती जमले होते. मला जोरजोरात हलवून उठवत होते. एव्हाना सगळ्यांना कळले होते की, मी स्वप्नात भूत पाहिले होते! मग मामाने मला भुतासंबंधी व्याख्यानच दिले. माझी समजूत काढली. भुताला आपल्यासारखा देह नसतो. त्यामुळे ते आपल्यासारखे वागूच शकत नाही. त्याला ऐकू येणार नाही. बोलता येणार नाही. ते आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. धरू शकणार नाही. मारू शकणार नाही.

आपणही भुताला काही करू शकणार नाही. ते आपल्याला दिसणार नाही. किंबहुना आपण व भूत एकमेकांशी संपर्कच साधू शकणार नाही. खरे तर भूत  अस्तित्वातच नाही. म्हणून ते आपल्याला दिसतही नाही. भुताची भीती ही कल्पनेतली भीती; भ्रमातून निर्माण झालेली भीती होय. मामाचा विचार मला मनोमन पटला आहे. भूत नसते, नसते, नसते!

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता

  • भूत निबंध मराठी / Bhut nibandh marathi
  • भूत वर मराठी निबंध  / Bhut var nibandh marathi
  • भूत आणि मी मराठी निबंध / Ghost nibandh marathi
  • भूत असते तर मराठी निबंध
  • भूत या विषयावर मराठी निबंध 

हे निबंध सुद्धा वाचा :

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा भूत आणि मी मराठी निबंध | Ghost Essay In Marathi कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x