पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध | Pruthviche Manogat Essay In Marathi Best 100 ते 400 Words

आज या पोस्ट मध्ये आपण पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध / Pruthviche Manogat Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Pruthviche Manogat Essay In Marathi

Pruthviche Manogat Essay In Marathi
पृथ्वी मनोगत मराठी निबंध

(मुद्दे : प्रथ्वीने पत्राच्या रूपात व्यक्‍त केलेले आपले यनोगत — माणसाला विचार करण्याचे आवाहन — पृथ्वीचा जन्म, वय इत्यादी — प्रथ्वीला स्वतःकडे असलेल्या सजीव सृष्टीचा अथिमान — आजपर्यतच्या इतिहासाचा उल्लेख — जीवसाखळीचे महत्त्व — माणसाची बुद्धी, हव्यास व नवीन जीवनशैलीची ओढ — विनाशाकडे वाटचाल — पुनर्विचाराची गरज )

माझ्या प्रिय मानवा, माझे, या पृथ्वीचे, तुला लक्ष लक्ष आशीर्वाद.

खूप दिवसांपासून मनात सारखं येत होतं – तुझ्याशी बोलावं. मन मोकळं करावं. दोन-चार गोष्टी तुला सांगाव्या त्यातल्या काही गोष्टी तुला कळल्या आणि तुझ्या वागण्यात तू काही बदल केलास, तर संपूर्ण मानवजातीचा फायदा होईल एवढंच नव्हे, तर माझ्या अंगाखांद्यावर वावरणाऱ्या संपूर्ण सजीव सृष्टीलाही चांगले दिवस पाहायला मिळतील.

माझा जन्म झाला, त्या घटनेला आता ५०० कोटी वर्षे होऊन गेली आहेत. नेमकी किती वर्षे झाली, तारीख कोणती होती, हे सांगता येणं तसं कठीणच आहे. तुम्हा माणसांचे आयुष्य लहान. मोजता येतील इतक्या दिवसांचे! म्हणून तर तारखा लक्षात ठेवून तुम्ही तुमचे वाढदिवस साजरे करता. माझे तसे नाही. अब्जावधी वर्षांच्या आयुष्यात तारखा लक्षात कशा ठेवणार? त्यामुळे माझे वय नेमके किती वर्षांचे, हे मला सांगता येणार नाही.

बहुतेक ५०० कोटी वर्षे झाली असावीत आतापर्यंत आणि आणखी ५०० कोटी वर्षे जगेन मी कदाचित. एवढ्या आयुष्यात अब्जावधी उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. अब्जावधी उत्पात झेलले आहेत. किती संहार डोळ्यांदेखत पाहिले आहेत! त्याचबरोबर फुललेली नंदनवनेही पाहिली आहेत मी येथे!

आणि बरं का माणसा, मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो. अभिमानही वाटतो. या विश्वात माझ्यासारखे कोट्यवधी, ‘अब्जावधीच नव्हे, तर कोणीही, कधीही मोजूच शकणार नाही इतके ग्रहगोल संचार करीत आहेत. त्यांतल्या अब्जावधी तरी ग्रहगोलांना मी अवकाशात संचार करता करता पाहिलं आहे. या अब्जावधी ग्रहगोलांपैकी एकाही ग्रहावर माझ्याकडे असलेल्या सजीव सृष्टीसारखी सृष्टी असल्याचे जाणवले नाही. विश्वाच्या मी पाहिलेल्या तुकड्यात तरी सजीव सृष्टीला खेळवणारी मी एकटीच! खरंच मी खूप भाग्यवान आहे. कसं घडलं असेल हे?

सगळंच्या सगळं सांगता येणं कठीण आहे. सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. जन्माच्या वेळी मी तप्त वायूंचा एक गोळा होते. हळूहळू वायू थंड होत गेले. मला भरीव आकार प्राप्त होत गेला. कालांतराने येथे पाणी निर्माण झाले. पाण्यामुळे सजीवांची निर्मिती झाली. एकामागून दुसरा, दुसऱ्यामागून तिसरा निर्माण होत गेला. असे होता होता सर्व सजीव एकमेकांशी घट्ट बांधले जात होते. यातून सर्व सजीवांचं एक जाळंच तयार झालं. त्या जाळ्याला निर्जीव वस्तूही जोडल्या गेल्या. हे सर्व इतकं एकरूपतेने झालं आहे की, या जाळ्यातला एक जरी घटक नष्ट झाला , तरी दुसऱ्याचे जीवन कोलमडणार.

नुसती कल्पना करून बघ. ही जी वनस्पतिसृष्टी आहे ना, ती संपूर्णच्या संपूर्ण एकाएकी नष्ट झाली, तर काय होईल? त्या वेळी सर्व शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मरतील. या शाकाहारी प्राण्यांपैकी अनेक प्राणी मांसाहारी प्राण्यांचं अन्न आहेत. म्हणजे शाकाहारी प्राणी नष्ट झाले, तर मांसाहारी प्राणीही संकटात येतील. मग अशी वेळ येईल की, हे प्राणीच ‘ एकमेकांना मारून खाऊ लागतील आणि अवघी प्राणिसृष्टी नष्ट होऊन जाईल.

हे तुला मी का सांगत आहे, माहीत आहे? माणसानेच ही सर्वनाशाची वेळ आणली आहे. बुद्धीच्या जोरावर माणसाने रोगराईवर मात केली. आपलं आयुष्य वाढवलं. मृत्यूचं प्रमाण कमी केलं. साहजिकच लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येची सोय करण्यासाठी बेसुमार जंगलतोड सुरू केली. वनस्पती नष्ट होऊ लागल्याने तिच्यावर अवलंबून असणारे प्राणीही नष्ट होऊ लागले. सजीवांच्या साखळीतील एकेक प्राणी नष्ट होत आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे ‘लागत आहेत.

अधूनमधून सैरभैर झालेले जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालत आहेत. यात माणसांच्या व जंगली प्राण्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. माणसाच्या कृतींमुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. यामुळे काही जीव नष्ट होत आहेत. तसेच, काही सूक्ष्मजीव नव्याने निर्माण होत आहेत. या सूक्ष्मजीवांमुळे नवनवे आजार, रोग ‘ फैलावत आहेत. त्यावर उपाय सापडत नसल्याने माणसे रोगांना बळी पडत आहेत. ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.

माणसाची हाव प्रचंड आहे. प्राण्यांचे तसे नाही. वाघाचे पोट भरलेले असेल, तर अगदी शेजारी पहुडलेल्या हरणाकडे तो ढुंकूनही बघत नाही. माणूस पोट भरल्यावरही आणखी आणखी गोळा करीत राहतो. उद्यासाठी, परवासाठी, मुलांसाठी,नातवंडांसाठी, त्यापुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा निसर्गाला ओरबाडत राहतो. बिल्डर, वाळूमाफिया, भूमाफिया, पाणीमाफिया ही काही शेलकी उदाहरणे सांगता येतील.

आधुनिक जीवनशैली निर्माण करण्याच्या नादातही माणसाने प्रदूषण निर्माण केले आहे. निसर्गावर अनन्वित अत्याचार केले आहेत. सुमारे दोनशे लाख वर्षापूर्वी निर्माण झालेला माणूस स्वत:च्या विनाशाच्या दिशेने वेगाने निघाला आहे. याला वेळीच आवर घातला नाही, तर सर्वत्र फक्‍त विनाशच दिसेल.

हे माझ्या प्रिय मानवा, माझे विचार, माझ्या भावना लक्षात घेशील का? मी आजपर्यंत निर्माण केलेलं सजीवांचे नंदनवन टिकवायला मदत करशील का?

खालील विषयावर देखील वरील निबंध लिहू शकता

  • पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध / Pruthviche Manogat Marathi Nibandh
  • मी पृथ्वी बोलत आहे निबंध लेखन मराठी / Pruthviche Manogat Essay In Marathi
  • मी पृथ्वी बोलते निबंध इन मराठी / Earth Occult Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध / Essay On Pruthviche Manogat Essay In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल, धन्यवाद..