मी पाहिलेली आग मराठी निबंध | Me Pahilela Aag Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण मी पाहिलेली आग मराठी निबंध / Me Pahilela Aag Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये निबंध लेखन करणार आहोत.

Me Pahilela Aag Essay In Marathi

Me Pahilela Aag Essay In Marathi

मी पाहिलेली आग मराठी निबंध

[ मुद्दे : आगीचे रौद्र रूप -तर्कवितर्क वातावरणातील भयाचे चित्र- अग्निशमन धुराचे लोट, किंकाळ्या दलाचे आगमन- आपत्तीविरुद्ध संघर्ष गरिबांचे संसार खाक अनेक तासांच्या धडपडीनंतर आग शांत अनेकांची सहृदय मदत मनावरील ठसा.]

रात्रीची वेळ होती. सर्वजण शांतपणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते. जाग आली ती कसल्यातरी गडबडगोंधळानेच. क्षणभर काही उमगेना. पण पाहिले तर घरातील सर्वजण बाहेर सज्ज्यात होते. मी पण धावत बाहेर गेले.समोर आगीचे रौद्र रूप दिसत होते. एका इमारतीला ती भिडली होती आणि त्याचबरोबर इमारतीच्या पाठीमागे असलेल्या झोपड्यांनाही तिने ग्रासले होते. खाली रस्त्यावर माणसांचा पूर लोटला होता.

ते सारे दृश्य पाहून माझ्या छातीत धडधड होऊ लागली. ‘आग कशी लागली असावी?’ याबद्दलचे तर्कवितर्क चालूहोते. कुणी म्हणत होते प्रथम इमारतीत ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली.तर कुणी म्हणत होते की, रात्री पेटत ठेवलेल्या रॉकेलच्या दिव्यामुळे आधी एक झोपडी पेटली आणि मग इतर झोपड्याही भरभर पेटल्या. कुणी म्हणत होते, बिल्डरांच्या गुंडांनीच आग लावली.

आगीचा मित्र ठरणारा वारा येथेही तिच्या साहाय्यास आला. त्यामुळे शेजारीच असलेली ती जुनी लाकडी चाळही पेटली. आगीने आता रौद्र रूप धारण केले होते. आरडाओरड, किंकाळ्या यांनी वातावरण भरून गेले होते.एवढ्यात ठण्ठण करीत आगीचा बंब आला. एकापाठोपाठ एक असे चार-पाच बंब आले. रस्ता अरुंद आणि त्यात अमाप गर्दी. त्यामुळे बंबांना आग लागलेल्या जागी  पोहोचणेही शक्य होईना. पण लोकांमध्येदेखील काहीजण स्वयंसेवक वृत्तीचे असतात.

त्यांच्या मदतीने पोलिसांनी गर्दी हटवली आणि अग्निशमन दल आपल्या कामासाठी पुढे सरसावले. आग विझवणाऱ्या लोकांनी प्रयत्नांची शर्थ चालवली होती. काही स्वयंसेवकही आपले प्राण धोक्यात घालून त्यांना मदत करीत होते.अडकलेल्या मंडळींना, काही पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन गाड्यांवरील शिड्या उंच उंच झेपावल्या होत्या. पाण्याचा मारा सुरू झाला. आगीच्या तावडीत न सापडलेल्या आजूबाजूच्या इमारतींवरही पाणी मारले जात होते.

सुदैवाने मनुष्यहानी झाली नव्हती; पण वित्तहानी भरपूर झाली होती. झोपडपट्टीतील एकही झोपडी वाचू शकली नव्हती. बिचाऱ्यांचे संसार जळून खाक झाले ! झोपड्यांतील काही बकऱ्या व कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. गोरगरिबांनी कष्ट करून जमवलेले किडूकमिडूक जळून गेले होते. सतत चार तास पाण्याचा मारा केल्यावर आग शमली होती. एवढ्या वेळात रात्र सरून दिवसाची चाहूल लागली होती. झोप केव्हाच उडून गेली होती.

लोक आता आगीच्याच गोष्टी करीत होते. अजूनही पोलीस कोणाला आगीच्या स्थळी जाऊ देत नव्हते. पण आपले काय गेले, काय राहिले हे पाहण्याची काळजी त्या लोकांना लागून राहिली होती. ते सर्वजण तेथेच बसून होते. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना चहापाणी दिले आणि वस्तीतले स्वयंसेवक, नगरसेवक आता या मंडळींची कोठे व्यवस्था करावी, त्यांना कशी मदत मिळवून दयावी, या विचारात पडले होते.

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या अनेक वस्तूंचा एक जळका वास सुटला होता आणि अर्धवट जळलेल्या अनेक वस्तूंचे अवशेष सभोवार पडले होते. अग्नीच्या त्या रौद्र तांडवाने मन मात्र उदास आणि विषण्ण झाले होते.

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • मी पाहिलेली आग मराठी निबंध / Me Pahileli Aag Marathi Nibandh
  • मी पाहिलेली आग निबंध लेखन / Write Essay On Me Pahileli Aag
  • आग वर मराठी निबंध / Essay  On Fire in Marathi

आम्हाला आशा आहे की मी पाहिलेली आग मराठी निबंध / Essay On Me Pahileli Aag In Marathi नक्कीच आवडली असेल धन्यवाद,

Leave a Comment