चांदण्यातील सहल मराठी निबंध | Chandnyatil Sahal Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण चांदण्यातील सहल मराठी निबंध / Chandnyatil Sahal Essay In Marathi हा निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Chandnyatil Sahal Essay In Marathi

Chandnyatil Sahal Essay In Marathi

( मुद्दे : सहलीचा अधिक अनुभवच आनंददायक त्यातही चांदण्यातील सहलीचा आनंद आल्हाददायक- चंद्रप्रकाशात सर्व सृष्टीचे न्हाऊन निघणे- सृष्टीतील शांतता ही मनाला आकृष्ट करणारी  रात्री नक्षत्रांचे दर्शन चांदण्यांचे लुकलुकणे मनोवेधक फेरफटका अधिकच संस्मरणीय चांदण्या रात्रीही आकाशातील तारकांचे मोहक दर्शन रसिक मनाला चांदण्या रात्रीतील सहल चिरकाल भिडणारी )

आजवर मी अनेकदा सहलींचा आनंद लुटला आहे. दरवर्षी आमची कौटुंबिक सहल असतेच; शिवाय इयत्ता पाचवीत असल्यापासून मी दरवर्षी शाळेतल्या सहलीला गेलो आहे. मात्र इतक्या सहलींपैकी या वर्षीची चांदण्यातील सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.

आमच्या कनिष्ठ महाविदयालयातील दरवर्षीची सहल ही शैक्षणिक स्वरूपाचीच असते. या वर्षी ती आकाशदर्शनाची होती. या आकाशदर्शनाच्या सहलीमुळे आम्ही चांदण्याचा विलक्षण आनंददायक अनुभव घेतला.

आकाशदर्शनासाठी गावाजवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते. बरोबर दुर्बिणीही घेतल्या होत्या. आम्ही वीस-पंचवीस मुलं-मुली महाविदयालयाच्या प्रांगणातून निघालो.

पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चांदण्याला जणू भरती आली होती. सारा आसमंत चांदण्याने तुडुंब भरला होता. आभाळ निरभ्र होते. आजूबाजूला विस्तीर्ण शेते पसरली होती.  गावाबाहेर आल्यामुळे सर्वत्र शांतता होती.

हवेत सुखद गारवा जाणवत होता. दूरवरून रातराणीचा व मधुमालतीचा संमिश्र गंध ये असल्यामुळे जणू काही चांदण्यालाच गंध येतो आहे, असा भास होत होता. आजूबाजूची झाडे आणि समोरचे डोंगर चांदण्यात न्हाऊन निघत होते.

या भारलेल्या वातावरणात कोणा एका मुलीला चांदण्यावरचे गाणे आठवले… ‘चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले’… तिने ते सुरेल आवाजात म्हटले. मग अनेकांनी चांदण्याच्या गाण्यांच्या आठवणी काढल्या.

सरांनी कविवर्य बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, मर्लेकर, ना. धों. महानोर इत्यादी कवींच्या चांदण्यावरील कविता म्हणून दाखवल्या. मग अशा ओळी, कविता आठवण्याची अहमहमिकाच लागली. रस्त्याच्या कडेला छोटेसे जलाशय लागले.

त्यात फारसे पाणी नव्हते; पण त्या संथ जलात आकाशाचे फार सुरेख प्रतिबिंब पडले होते. चला आता, टेकडीवर जाऊन तारे पाहू या,’ सरांच्या या शब्दांसरशी आम्ही सर्वजण डोंगर चढू लागलो.

अर्ध्या तासातच आम्ही डोंगरमाथ्यावर जाऊन पोहोचलो. तिथल्या छोट्याशा देवळाबाहेर सर्वजण थांबलो. सरांनी दुर्बीण स्टँडवर लावली आणि एकेकाला नक्षत्रे दाखवून त्यांच्याविषयी ते माहिती देऊ लागले.

सारी आकाशगंगा डोळ्यांसमोर तरळत राहिली. आकाशातील तारकापुंजांनी आमचे लक्ष वेधून घेतले. जणू काही प्राजक्त फुलून त्याची पांढरीशुभ्र फुले चांदण्यांच्या रूपाने आकाशात सगळीकडे पसरली आहेत असे भासत होते.

तांबूस मंगळ, निळा तेजस्वी शुक्र आणि विविध गांच्या छटा असलेले इतर ग्रह पाहिल्यावर आकाशाचे सरोवर अनेकविध रंगांच्या कमळांनी फुलून गेल्यासारखे वाटत होते. रुपेरी रथात बसून रजनीनाथ आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करीत होता.

निसर्गाने आकाशात मुक्तहस्ताने उधळलेली नक्षत्रमौक्तिके मनाला भुरळ घालत होती. अरसिक माणसाला आणि निर्बुद्धालाही काव्यस्फूर्ती व्हावी, इतके ते दृश्य विलोभनीय होते! तेवढ्यात आमच्या एका मित्राने बासरीचे सूर आळवायला सुरुवात केली.

त्या स्वरांनी आमचे नानच हरपले. तो नयनरम्य देखावा मनात साठवून आम्ही परतीची वाट चालू लागलो. तेव्हा ते सूरही आमच्या मनात दूरपर्यंत रेंगाळत राहिले. जणू काही चांदण्यालाच स्वर फुटला होता !

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • चांदण्यातील सहल मराठी निबंध लेखन / Chandnyatil Sahal Marathi Nibandh
  • चांदण्यातील सहल निबंध लेखन मराठी मध्ये / Chandnyatil Sahal Nibandh In Marathi
  • चांदण्यामधील सहल वर मराठी निबंध / Trip Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की चांदण्यातील सहल मराठी निबंध / Essay On Chandnyatil Sahal In Marathi हा निबंध नक्कीच आवडला असेल धन्यवाद,