अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashatavinayak 8 Sampoorn Darashan Awesome Information In Marathi

अष्टविनायक दर्शन संपूर्ण

ashtavinayak darshan

अष्टविनायक दर्शनाचा क्रम-Ashtvinayak Darshan-अष्टविनायक गणपती नावे 

  1. पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वर
  2. दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
  3. तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर
  4. चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक
  5. पाचवा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी
  6. सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
  7. सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर
  8. आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

 

अष्टविनायक दर्शन नकाशा -Ashtvinayak Darshan Map -अष्टविनायक दर्शन कसे करावे 

अष्टविनायक दर्शन नकाशा

 

अष्टविनायक दर्शन यात्रा-Ashtvinayak Darshan Yatra 

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते.
 
अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.
 
अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.
 
ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात.

अष्टविनायक गणपती फोटो – अष्टविनायक गणपती कथा -अष्टविनायक गणपती माहिती -Ashtvinayak Ganpati Photo

.

पहिला गणपती – मोरगांवचा श्री मयुरेश्वर

अष्टविनायक दर्शन संपूर्ण मोरगाव चा गणपती

 

मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले?

              फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरु केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले. मीलवकरचपार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन.
.
         सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, ”आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे.’ याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, ‘सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे.”
.
गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले
.

दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

 

अष्टविनायक दर्शन संपूर्ण सिद्धटेकचा गणपती

 

सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे-या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात? – येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले?

         फार प्राचीन काळी, एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु केली. गणेशाने त्याला एकाक्षरमंत्राचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व ‘तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील’ असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्या वेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु-कैटभांचे घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध चालले, तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही; म्हणून तो शंकराकडे गेला.
.
युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने ‘श्रीगणेशाय नमः’ या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिध्दी प्राप्त झाली. मग त्याने मधु-कैटभांना ठार केले. विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिध्दी प्राप्त झाली, त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली, म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला ‘श्रीसिद्धिविनायक’ असे म्हणतात. या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
..
कालांतराने ते मंदिर नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवीत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले. तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर. तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरु केली. पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले, अशी एक आख्यायिका आहे.

.

तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

 

अष्टविनायक दर्शन संपूर्ण पालीचा गणपती

पालीच्या गणेशाला बल्लाळेश्वर असे नाव का पडले?

            फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन ‘बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले’ अशी तक्रार करू लागले.
आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली.
.
गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, ‘येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.’ असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.
थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ”हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.’
बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ”तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.”
.
तेव्हा बल्लाळ म्हणाला – ”तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावयास. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.”
तेव्हा गणेश म्हणाला – ‘‘तुझ्या इच्छेनुसार मी इथे ‘बल्लाळ विनायक’ या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.” असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
.

चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

अष्टविनायक दर्शन संपूर्ण महाडचा गणपती

महाडच्या  गणेशाला वरदविनायक असे नाव का पडले?

        फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ”तुला लवकरच पुत्र प्राप्ती होईल” असा त्याने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.
.
एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा रुक्मांगदाला शाप दिला.
शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.
इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती.
.
त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ”तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.” विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला.ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला ‘वरद विनायक’ म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो.
.

पाचवा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

अष्टविनायक दर्शन संपूर्ण थेऊर चा गणपती चिंतामणी

थेऊरच्या  गणेशाला चिंतामणी असे नाव का पडले?

            फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती. सारे काही व्यवस्थित होते, पण राजाला पुत्रसंतान नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा-राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले गण. गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तापट होता. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिलांच्याजवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला भोजन घातले. गणराजाला ते रत्न हवे होते, पण कपिलाने ते देण्यास नकार दिला. तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले; कपिलाला फार वाईट वाटले. मग त्याने दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाला व त्याचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले.
.
        पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले. विनायकाने गणराजाला ठार मारले. तेव्हा त्याच्या पित्याने अभिजीताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले. विनायकाने ते कपिलाला परत दिले, पण कपिलाने ते स्वीकारले नाही. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव्य करू लागला, तो आजतागायत. पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवती एक गाव वसले. त्याचे नव कदंबनगर. ते पुढे कदंबतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. हे कदंबतीर्थ म्हणजेच सध्याचे थेऊर व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक.
.
        अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता गौतमाच्याच आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वीप्रमाणेच सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले व शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्रीगणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास ‘चिंतामणी’ असे नाव दिले. तेच हे थेऊर क्षेत्र.
.
        ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी, ते शांत व्हावे म्हणून श्रीगणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असे नाव दिले व तेथे ‘चिंतामणी’ गणेशाची स्थापना केली म्हणून या क्षेत्राला थेऊर असे नाव प्राप्त झाले.
.

सहावा गणपती– लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

अष्टविनायक दर्शन संपूर्ण लेण्याद्रीचा गणपती

लेण्याद्रीच्या  गणेशाला गिरिजात्मक असे नाव का पडले?

        आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन, तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्र रूपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र व सुंदर शरीर होते (अष्टविनायक संपूर्ण दर्शन)
गिरिजात्मज गणेशाने १२ वर्षे या क्षेत्रात तप केले. अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गणेशाचामयुरेश्वर‘ अवतार झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.
.

सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर

अष्टविनायक दर्शन संपूर्ण ओझरचा गणपती

 

 

ओझरच्या गणेशाला विघ्नेश्वर असे नाव का पडले?

    फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले. ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारदमुनींकडून समजली. तो घाबरला. त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्याच क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्राने आज्ञा केली, ‘अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर.‘ त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठेच संकट आले. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्या वेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला. ‘मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो‘ असे त्याने देवांना आश्वासन दिले.
.
        मग गजाननाने पाराशरपुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, ‘ज्या ठिकाणी माझे भजन-पूजन-कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये.‘ मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, ‘तुमच्या नावामागे माझे नाव असावे. ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.’ तथास्तु’ असे म्हणून गजानन म्हणाला, ”मी आजपासून ‘विघ्नेश्वर’ झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे. ‘विघ्नेश्वर’ या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.”
.
        अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला; म्हणून गजाननास ‘विघ्नेश्वर” किंवा ‘विघ्नहर’ असे नाव या स्थानी प्राप्त झाले.मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैरुत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली. हाच तो ओझरचा ‘श्री विघ्नेश्वर विनायक’ 
.

  आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

अष्टविनायक दर्शन संपूर्ण रांजनगावचा गणपती

 

 

रांजणगांवच्या गणेशाला महागणपती असे नाव का पडले?

 

        फार प्राचीन काळी गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यांत पंडित असा ऋषी होऊन गेला. तो थोर गणेशभक्त होता. एकदा त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपले पुत्र मानले. ‘मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादांक्रांत करून इंद्रालाही जिंकेन’ असे तो मुलगा म्हणाला. मग गृत्समदाने त्याला ‘गणानां त्वा’ या गणेशमंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने वनात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याच प्रमाणे त्याला लोखंड, रूपे व सुवर्ण यांची तीन नगरेही दिली. ‘या त्रिपुरांचा नाश भगवान शिवशिवाय कोणीही करणार नाही. भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करील व तुलाही मुक्ती मिळेल’ असा वर गणेशाने दिला म्हणून तो मुलगा त्रिपुरासुर या नावाने प्रसिद्ध झाला.
.
             गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवन करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण गेले. त्रिपुरासुराचा वध करण्याचे शंकराने आश्वासन दिले. मग भगवान शिव त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुराचे व शिवाचे घनघोर युद्ध झाले; पण शिवाला त्रिपुरासुर आवरेना. तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितले की, ‘युद्धारंभी आपण विघ्नहारी गणेशाचे स्मरण केले नाही’ म्हणून विजय मिळाला नाही. मग नारदांनी शंकराला ‘प्रणम्य शिरसा देव’ हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितले. शंकरांनी त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली असता त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व ‘मीच गणेश’ असे सांगून वर मागण्यास सांगितले. त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला. तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला व या स्थानाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाला.
.
        मग शिवाचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध झाले व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा व त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावे म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना व आराधना केली; तोच हा मणिपूरचा रांजणगावचा श्री महागणपती 
.
 ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

Leave a Comment