आमची आरोग्यसेविका मराठी निबंध | Aamchi Aarogya Sevika Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आमची आरोग्यसेविका मराठी निबंध | Aamchi Aarogya Sevika Essay In Marathi या विषयावर 100 ते 400 शब्दांमध्ये निबंध लेखन करणार आहे.

Aamchi Aarogya Sevika Essay In Marathi

( मुद्दे : गावातील एका सर्वसाधारण पदावरील व्यक्ती – कामाच्या प्रारंभीच घडलेले दर्शन – कामाचे स्वरूप – सगळ्यांशी आपुलकीचे वागणे – कार्यतत्परतेची एक दोन उदाहरणे – स्वतःच्या कक्षेच्या बाहेर – लोकांवर पडलेला प्रभाव जाऊन काम करण्याची वृत्ती – व्यापक दृष्टी बाळगून काम करण्याची तत्परता )

आरोग्यसेविका, सर्व गावकऱ्यांचा आधार. सर्वांशीच त्या जिव्हाळ्याने वागतात. जिव्हाळ्याने वागणे हा त्यांचा स्वभावच आहे. मला ठाऊक आहे ना. आमच्या वाडीवर आल्या की मीच तर त्यांच्याबरोबर जाते प्रत्येक घरात! त्या प्रत्येक घरात कशा बोलतात, हे मी पाहतच असते. मला त्यांचे बोलणे खूप आवडते. मी तसेच बोलण्याचा प्रयत्नही करते. सरिताताई आरोग्यसेविका आहेत. त्या कोणते काम करतात, ठाऊक आहे? सर्दी, खोकला, साधा ताप, डोकेदुखी यांवर त्या औषध देतात.

जे रुग्ण आहेत, ते वेळेवर औषध घेतात का? त्यांची कोणती औषधे संपली आहेत? कोणती आणायची आहेत? कोणती पथ्ये पाळायची आहेत? या सगळ्याची त्या बारकाईने चौकशी करतात आणि शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांसंदर्भात आम्हांला सूचना देतात. त्यांना प्रथमोपचार चांगला येतो. त्या प्रथमोपचार शिकवतातही. गावातल्या प्रत्येक वाडीवर आठवड्यातून एकदा फेरी मारतात.

वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना मार्गदर्शन करतात. आजारपण आले की हतबल होणारे आमचे फ्रिड गाव आता रोगराईला आत्मविश्वासाने तोंड देते. प्रशासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन सरिताताई आरोग्यसेविका बनल्या. त्यांची पहिली नेमणूक झाली ती आमच्या गावातच. नेमणुकीनंतर सुरुवातीलाच त्यांनी काय केले माहीत आहे? त्यांनी प्रत्येक वाडीवर येऊन सभा घेतली. त्या सभेत त्यांनी स्वच्छता, आहार व आरोग्य यांविषयी माहिती दिली.

सर्दी, खोकला, साधा ताप, अतिसार, किरकोळ जखमा यांबाबत कोणती काळजी घ्यावी, हे समजावून सांगितले. लोकांच्या मनातल्या अनेक शंका दूर केल्या. त्या वेळी अल्पशा आजाराने त्रस्त झालेले काहीजण तेथे होते. त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांनी त्यांना औषधेही दिली. सगळे लोक खूश झाले. एकदा आमच्या वाडीतील दामू झाडावरून पडला. त्याला जबरदस्त मार लागला होता. तो रक्ताने माखला होता.

सारखा रडत-विव्हळत होता. तेवढ्यात सरिताताई तेथे आल्या. त्यांनी त्वरेने प्रथमोपचार सुरू केले. दोघांना मदतीला घेतले आणि दामूला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचे केसपेपर तयार करणे, वेगवेगळ्या नर्स व डॉक्टरांना भेटणे, त्यांना सर्व माहिती देणे या गोष्टी त्यांनी अत्यंत त्वरेने व अचूक केल्या. दामूच्या हाताच्या हाडांना खूपच मार लागला होता. हाडांना चिरा पडल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

या परिस्थितीत दामूच्या कुटुंबीयांना सरिताताईंनी मानसिक आधार दिला. दामूच्या शुश्रूषेसंबंधात तपशीलवार सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये कोणी कोणी किती वेळ थांबायचे, काय काय करायचे याचे वेळापत्रकच तयार करून दिले. दामूला घरी आणल्यावरही त्या दामूच्या घरी नियमित येत. त्याची शुश्रूषा व्यवस्थित चालावी, याची दक्षता बाळगत. एके रात्री सदाआजोबा अचानक आजारी पडले.

सगळेजण घाबरले. अशा वेळी बोलावणार कोणाला? सरिताताईंनाच. त्या आल्या आणि त्यांनी आजोबांना एक गोळी दिली. कोणाकोणाला दूरध्वनी केले एक रिक्षा बोलावली आणि आजोबांना स्वत: हॉस्पिटलमध्ये नेले. किरकोळ आजारात सरिताताई डॉक्टरांशी फोनवर बोलून औषधोपचार करतात. साथीच्या काळात त्यांचे मार्गदर्शन असतेच. एखादया घरी बाळ जन्माला आले किंवा मृत्यू घडला, तर त्या स्वत: घरी जाऊन सगळी माहिती विचारून घेतात.

स्वत: फॉर्म भरतात आणि संबंधित अधिकाऱ्याला देतात. आजारी पडल्यावर उपचार करण्याबरोबरच आजारी न पडण्यावर त्या भर देतात. तसा आग्रह धरतात. कुठेही न थुंकणे, उघड्यावर मलमूत्र विसर्जन न करणे, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करणे आदींसंबंधात त्या खूप आग्रही आहेत. पूर्वी आमच्या गावात घरातल्या सांडपाण्याचे ओघळ घराच्या बाजूलाच वाहत. सांडपाणी अनेकदा साचून राही. सरिताताईंनी सरपंचांना सांगून संपूर्ण गावात शोषखड्ड्यांचा प्रचार करायला लावला.

शोषखड्ड्यांमुळे गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता आली. अशा या आमच्या सरिताताई. त्या प्रेमळ आहेत. सहृदय आहेत. आपले काम त्या तत्परतेने व निष्ठेने करतात. त्यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे. त्यांच्या साध्या साध्या सूचनाही गावकरी मनापासून स्वीकारतात. गावकऱ्यांच्या अंगी आरोग्याच्या काही चांगल्या सवयी मुरू लागल्या आहेत. खरे पाहता, ‘आरोग्यसेविका’ हे एक साधेसे पद आहे. या लहान पदावरील सरिताताईंनी स्वत:च्या निष्ठेमुळे गावकऱ्यांच्या मनात मोठे स्थान मिळवले आहे.

वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता

  • आमची आरोग्यसेविका  निबंध मराठी / Aamchi Aarogya Sevika nibandh marathi
  • आरोग्यसेविका निबंध मराठी / Aarogya Sevika nibandh marathi
  • माझी आरोग्यसेविका मराठी निबंध / Mazi Aarogya Sevika nibandh marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा आमची आरोग्यसेविका मराठी निबंध / Essay On Marathi On Aamchi Aarogya Sevika कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment