श्रावणातला पाऊस मराठी निबंध | Shravanatla Paus Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

आज या पोस्ट मध्ये आपण श्रावणातला पाऊस मराठी निबंध / Shravanatla Paus Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Shravanatla Paus Essay In Marathi

( मुद्दे : प्रास्ताविक श्रावणातला पाऊस- अलवारपणा, आषाढातला पाऊस- धसमुसळेपणा करणारा मुलायमपणा यांचे दर्शन घडवणारा – -जीवनातील सर्व कोमलता श्रावणातील पावसाकडे; म्हणूनच निसर्गाची, सौंदर्याची विविध लेणी श्रावणातील पावसाचे एक अद्भुत दर्शन. )

पाऊस म्हणजे निसर्गाची एक भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस माझा जिवाभावाचा सखाच बनला आहे. हा पाऊस मला अनेक रूपांत भेटला आहे.

पावसाळ्याचे दिवस होते. आभाळभर ढग जमा होत होते. भर दुपारी अंधारून आले. गार वारे जोरजोरात वाहू लागले… आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला.

आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावत होते. एखादया अवखळ, दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता.

मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होती. खरे तर, पावसाबरोबर मुले नाचत-खेळत होती की पाऊसच मुलांच्या आडदांड उत्साहात भिजत होता, हे सांगणे कठीण होते! पावसाचे हे रूप मला आवडते.

पण माझ्या मनाला अलवार स्पर्श करतो, तो मात्र श्रावणातलाच पाऊस. श्रावणात मी वेगळाच पाऊस पाहिला. तो आला तोच मुळी अलवारपणे रिमझिमत… अंगांगाला मृदुमुलायम स्पर्श करीत! अचानक दोन-चार सरी धरतीवर अलगद रिमझिमल्या आणि तेवढ्यात त्या अदृश्यही झाल्या! क्षणातच ऊन पसरू लागले.

काही अवधीतच पुन्हा पावसाच्या सरी अवतरल्या आणि त्यापाठोपाठ ऊनही! ऊनपावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता. काही वेळा तर उन्हातच पाऊस रिमझिमला आणि चमचमणाऱ्या प्रकाशबिंदूंचा हळुवार वर्षावच स्वर्गातून पृथ्वीवर होत असल्याचा भास झाला.

त्याच वेळी एक अद्भुत स्वप्नवत दृश्य अवतरले. कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागले. आषाढातला पाऊस फार आडदांड असतो. खरे तर, पाऊस आला की, माणसाच्या मनात चैतन्य लहरू लागते.

त्याचे मन हळुवार, कोमल बनते. ‘बरस बरस तू मेघा रिमझिम। आज यायचे माझे प्रियतम।’ अशी व्याकूळ, मृदू भावना प्रियतमेच्या मनात जागी होते. पण धुवाधार पाऊस ही मृदुमुलायमता झोडपून टाकतो.

श्रावणातला पाऊस मात्र मानवी भावभावनांचा सर्व कोमलपणा, हळुवारपणा, नाजूकपणा तितक्याच हळव्या मनाने जपतो. तो जितक्या नजाकतीने निसर्गाला रमणीय रूप बहाल करतो, तसे तो अन्य कोणत्याही महिन्यात करीत नाही.

झाडे,वेली, वने श्रावणात टवटवीत बनून सुहास्य वदनाने डोलत असतात. धरती जणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेत असते. जिकडे पाहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरलेले असते. हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात.

श्रावणातील ऊनही रेशमी मुलायम स्पर्श घेऊनच येते. जणू काही विश्वातील संपूर्ण कोमलता, संपूर्ण मार्दव या श्रावणातील पावसालाच लाभले असावे, असे वाटत राहते. या श्रावणातल्या पावसाचा एकदा मी अद्भुत अनुभव घेतला आहे.

एकदा आम्ही माथेरानच्या शिखरावर ढगांतूनच हिंडत होतो. समोर पाच फुटांवरचेही काही दिसत नव्हते. अवतीभवती धुके आणि फक्त धुकेच! त्या वेळीही पाऊस पडत होता. ढगाचे सूक्ष्म सूक्ष्म कण फटकन फुटत असल्यासारखा कट्कट असा अत्यंत सूक्ष्म आवाज कानाला जाणवत होता.

अंगाला पावसाचा स्पर्शही होत होता. कपडे भिजत होते. पण तो डोळ्यांना दिसत मात्र नव्हता. म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही! असा आहे-नाहीच्या सीमारेषेवररेंगाळणारा अद्भुत पाऊस! त्याच्या जन्मस्थळीचा, ढगातला!

असा हा माझा प्रिय श्रावणपाऊस! मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो, कसाही असलो, तरी तो माझ्या काळजात रिमझिमत राहील.

खालील विषयावर देखील वरील निबंध लिहू शकता

  • श्रावणी पाऊस मराठी निबंध / Shravan Paus Marathi Nibandh
  • श्रवणातला पाऊस निबंध लेखन मराठी / Shravanatala Paus Essay In Marathi
  • श्रावण महिन्यातील पाऊस निबंध इन मराठी / Shravan Mahinyatil Paus Nibandh In Marathi

हे सुद्धा वाचा

आम्हाला आशा आहे की श्रावण महिन्यातील पाऊस मराठी निबंध / Essay On Shravan Mahinyatil Paus In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल, धन्यवाद..

WhatsApp Group Join Group

Comments are closed.